बातम्या

अजूनही पुण्याच्या जागेवरील हक्क सोडलेला नाही : अजित पवार

पुणे: पुणे लोकसभा जागेवरील हक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोडल्याची जोरदार चर्चा असतानाच या चर्चेला काही अर्थ नाही. पुण्यासह उर्वरित ८ जागांबाबत बोलणी सुरू आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीने पुण्याचा आग्रह सोडून दिल्याची चर्चा आहे.

अजित पवार एका कार्यक्रमासाठी पुण्यात होते. ते म्हणाले की, पुण्याच्या जागेसंदर्भात अजून निर्णय झालेला नाही. आघाडीबाबत त्यांनी सांगितले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. ४० मतदारसंघांबाबत एकमत झाले असून आठ जागांबाबत तिढा आहे. पण त्यावरही चर्चा करून लवकरच निर्णय होईल, असे पवार यांनी सांगितले. कालपासून समाज माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवरून पुण्याच्या जागेवरील दावा राष्ट्रवादीने सोडल्याच्या बातम्या दिल्या जात आहेत. याबाबत पवार यांनी त्या चर्चेत काही अर्थ नाही. पुण्याच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

Share this: