बातम्या

बीड सैराट हत्याकांड :माझ्या भावासहीत बाकीच्या गुन्हेगारांना फाशीच द्या


बहिणीला पळवून नेऊन तिच्यासोबत विवाह करणारा सुमीत वाघमारे दिसला की बालाजीचे पित्त खवळायचे. त्याच्याबद्दल मनात भयंकर राग होता. यातूनच ३ महिन्यांपूर्वी त्याने सुमीतला संपवण्याचा कट रचला. एक वेळ संपूर्ण तयारीही करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी नियोजन बिघडले. पण दुसऱ्या वेळी मात्र भररस्त्यातच गाठून भाग्यश्री समोरच त्याची हत्या करण्यात आली.


वास्तव संघर्ष
बीड- प्रेमप्रकरणातून बहिणीबरोबर विवाह केल्याने सुमीत वाघमारे या तरुणाची मेहुण्याने मित्राच्या मदतीने भररस्त्यात हत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली होती. या कटात आतेभावांनी सहभाग नोंदवल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनेच्या सहा दिवसांनंतर मंगळवारी पोलिसांनी यातील फरार मुख्य आरोपी बालाजी लांडगे, संकेत वाघ यांच्यासह कटात सहभागी गजानन रवींद्र क्षीरसागर याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हत्या करण्यात आलेल्या सुमीतला न्याय देण्यासाठी त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, भाग्यश्रीचे पुनर्वसन करून वाघमारे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सुमीत वाघमारेच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, अजय सरवदे, पुष्पा तुरूकमाने, अरुणा आठवले, गोपीनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर कवठेकर, लखन शिनगारे, धम्मानंद वाघमारे आदींचा सहभाग होता.

पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणात एकूण २७ जणांची चौकशी करण्यात आली आहे. कटात सहभागी चौघे अटकेत अाहेत. यामध्ये खुनाबरोबरच १२० (ब) हे कलम वाढवण्यात आले आहे.

Share this: