विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लोटला लाखोचा भीमसागर

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी मंगळवारी (दि.१ जाने.) लाखोंचा भीमसागर लोटला. राज्य व देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. काही अपवाद वगळता ग्रामस्थांनी गुलाबपुष्पासह अल्पोपहार देऊन केलेल्या स्वागताने सामाजिक सौहार्दाचे अनोखे दर्शन घडले.  गेल्या वर्षी विजयदिनाच्या दिवशी झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडकोट नियोजन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून होते. दहा हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी होते. मात्र, प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. तरीही कार्यकर्त्यांनी शांततेत आणि समजुतदारपणे पोलीसांना सहकार्य केले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने शौर्य स्तंभास अभिवादन करण्यात आले.

कोरेगाव भीमा येथे रात्री सोमवार (दि३१)बारा वाजल्यापासूनच भीम अनुयायी येत होते. विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट केली होती. रात्री बारा वाजता सामुहिक बुध्दवंदेनेने अभिवादन कार्यक्रमास सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजता महार रेजीमेंटच्या निवृत्त १०० जवांनानी आणि समता सैनिक दलाच्या पाचशे जवानांनी संचलन करून मानवंदना दिली. रिटायर्ड महार रेजिमेंटच्या १०० जवानानी, भारतीय बौद्ध महासभेप्रणीत समाता सैनिक दलाच्या ५०० सैनिकांनी संचलन करुन सलामी दिली.

Share this: