बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे.ईव्हीएम छेडछाड भाजपने केली का? शरद पवार 

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील मतदान संपलं असलं तरीही राजकारण अजूनही तापलेलं आहे . या तापलेल्या वातावरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. ‘बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे.ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?’ अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे.

याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘देशभरात ईव्हीएम मशीन बाबत कित्येकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएम मशीनच्या जोरावर तर केला जात नाही ना?’

‘ईव्हीएम छेडछाड झाली तर एखादा माणूस संसदेत जाईल. पण त्यामुळे संसदीय लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात होईल. यातून लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो असेही पवार यावेळी म्हणाले

Share this: