कविता: स्त्री आहे ती, माणूस आहे ती

कविता: स्त्री आहे ती, माणूस आहे ती

भोग भोग भोगायची वस्तू नाहीरे ती
जरा डोकावून बघ तिच्या आत
भावनांचा कल्लोळ माजलाय
तिच्या चेहऱ्यावर नसलेला

चढ चढ चढतोय नुसता
कधी तरी उतरून बघ
आतमध्ये एकदा,
आणि बघ दिसतोय का
वेदनांचा पसारा

तुट तुट तुटतेय रे ती
शरिर नको बघू नुसतं तिचं
मनाला पडतात तिच्या
तुझ्या नखांचे ओरखडे,
ओरबाडून घेताना तू शरिर तिचं

मर मर मरतेय रे ती
मादी म्हणूनच नको बघूस
स्त्री आहे ती माणूस आहे ती
तू ही पुन्हा बन माणूस

  • वनेश माळी
Share this: