मनोरंजन जगतलेख-कविता

जातीव्यवस्थेचे एकेक पदर संवादातून खुले होतात.. हेच आर्टिकल 15 चे वेगळेपण:उदय कुलकर्णी

वास्तव संघर्ष आॅनलाईन :by उदय कुलकर्णी

२०१२मध्ये अक्षय कुमारचा रावडी राठोड सिनेमा आला होता. सिनेमा कदाचित आठवणार नाही, पण त्यातले आ..रे प्रीतम प्यारे हे आयटम सॉन्ग अनेकवेळा दाखवलं गेलं होतं. या सिनेमाची स्टोरी आहे, देवगड नावाचं एक खेडं आहे, विक्रम राठोड नावाच्या एका आयपीएस ऑफिसरचं तिथे पोस्टींग होतं. त्या गावात बाबाजी नावाचा एक व्हिलन आहे, त्याची तरूण पोरं पण व्हिलन आहेत आणि संपूर्ण गावावर त्यांचा वचक आहे. त्यांची खलनायकी कृत्य सुरू आहेत. ते विशाल शर्मा नावाच्या इन्स्पेक्टरच्या बायकोवरच रेप करतात.

आयपीएस ऑफिसर विक्रम राठोड त्यांना पकडायला जातो तर ते त्याच्यावर जीवघेणा हल्ला करतात, त्यात तो मरतो, पण अगदी त्याच्यासारखा दिसणारा शिवा (अक्षय कुमार) तिथे जातो आणि त्या व्हिलन लोकांना वठणीवर आणतो. नंतर त्यांना मारूनच टाकतो. मग गावच्या लोकात आनंदी आनंद.

अशी स्टोरी असलेला हा एकमेव असा सिनेमा नाही. अशा आणखीही काही त्याच्या आवृत्त्या तुम्हाला मिळतील. पूर्वी तर काही मराठी सिनेमाही असेच होते आणि त्यातील खलनायकाच्या भूमिकेसाठी निळू फुले प्रसिद्ध होते.

आर्टिकल 15चं कथानक बघितलं तर त्यातही गावातील दोन मुलींवर खलनायक रेप करतो, त्याला पोलीस इन्स्पेक्टरची साथ आहे आणि या खलनायकावर राजकीय नेत्याचा वरदहस्तही आहे. म्हणजे व्यवसायिक सिनेमाचे हे सगळे घटक यात आहेत. मात्र हा पूर्णपणे वेगळ्या वळणाने जातो. त्याला खलनायक म्हणून कोणी व्यक्ती समोर आणून त्याच्यावर फोकस करायचा नाही. त्याला व्यवस्था कशी चालते ते दाखवायचं आहे, जातवास्तव दाखवायचं आहे. यात गरीबी वरती भाष्य आहे तेही कथानकाला धरून आहे. सफाई कामगार कसे गटारात पूर्ण उतरुन काम करतात तेही येतं. राजकारणही येतं, पण हा अजिबात प्रचारकी होत नाही. हिरो मीडियाचा वापर करून करतो, पण इतर सिनेमात दाखवतात तसा मीडियाचा हंगामा दाखवलेला नाही. त्याला खूप फुटेज नाही, बस, एक हेडलाईन छापलेली दाखवलेली आहे. रेपचं दृश्य तर टाळलेलंच आहे.

यातील पोलिस ऑफिसर जो हिरो आहे, त्याला हिरोगिरी दाखवण्यासाठी मारामारी करावी लागत नाही की आरडाओरडा करावा लागत नाही. जातीव्यवस्थेचे एकेक पदर संवादातून खुले होतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेलं आहे, हिंदू धर्मातील जातीव्यवस्था इतकी टिकण्याचं कारण, प्रत्येक जातीला तिच्या खालची एक जात दिलेली आहे, त्यामुळे क्षत्रिय म्हणतो, भलेही मी ब्राम्हणाच्या खाली असेन, पण माझ्या खाली आणखी कोणी आहे, अशी ही उतरंड थेट शेवटपर्यंत आहे. ह्या त्यांच्या विधानाचा सिनेमात चपखल उपयोग करण्यात आलेला आहे.

सिनेमाला एक व्यवस्थित कथानक आहे. केवळ अजेंडा समोर करणे असे होत नाही. सिनेमाचा शेवट सुखदायी, आशावादी आहे, पण तोही कथानकाशी सुसंगत आहे, जे सिनेमात तोपर्यंत चाललेलं असतं त्याच्याशी संगतवारच आहे.

याचे मर्मभेदक संवाद याची जान आहेत.

हा सिनेमा ही एक सुरुवात आहे. आता आणखी असे सिनेमा येतील अशी आशा करुया.

हा सिनेमा अवश्य बघा..

उदय कुलकर्णी
लेखक हे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक असून लेख त्याच्या नावावर राखीव आहे

Share this: