रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिण भावावर काळाचा घाला,कारच्या धडकेत ६ वर्षीय भावाचा मृत्यू

 

जालना (वास्तव संघर्ष आॅनलाईन) – रक्षाबंधन आणि 15  ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आल्यानं गुरुवारी राज्यात आनंदाचं वातावरण होतं. मात्र औरंगाबादमधल्या बहिण भावासाठी आज काळाने घाला घातला आहे . स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी झेंडावंदन करण्यासाठी शाळेकडे जाण्यासाठी बसची वाट पाहात उभ्या असलेल्या ६ वर्षीय विद्यार्थ्यांला आणि त्याच्या छोट्या बहिणीला एका भरधाव कारने या चिमुकल्यांना उडवलं त्यात भावाचा मृत्यू झाला तर बहिण गंभीर जखमी आहे.

संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय ६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव असून तो  पहिलीत होता. तर त्याची बहिण श्रावणी (वय ९) ही तिसरीत होती. संभाजी आणि श्रावणी हे शाळेत जाण्यासाठी बसची वाट बघत होते. स्वातंत्र्य दिवस असल्याने संभाजीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभुषा केली होती. मात्र नियतीला ते मंजूर नव्हतं. ही भावंड बस स्टॉपवर असतानाच एका भरधाव कारने या दोघांनाही धडक दिली..

या धडकेत संभाजीचा जागीच मृत्यू झाला तर श्रावणी तब्बल 20 फुट फरफटत गेली. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताने शिंदे कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं. कारचालक हा अल्पवयीन होता अशी माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी  साडे सहा वाजता झलटागाव मधील जालना बीड बायपास येथे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. संभाजीच्या अपघाती मृत्यूने शिंदे परिवारावर शोककळा पसरली आहे. पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.

Share this: