बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विधानसभेची आचारसंहिता दहा दिवसात;भाजप-शिवसेना युती नक्की होणार – चंद्रकांतदादा पाटील

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी चिंचवड शहरातील राज्य शासनाकडे प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज शुक्रवार (दि. ३०) रोजी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात आले होते.

याप्रसंगी त्यांनी अवैध बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प, आकृतीबंध, महापालिका हद्दीवरील पश्‍चिमेकडील गावे महापालिकेत समाविष्ट करुन घेणे, एच. ए. च्या ताब्यातील अतिरिक्‍त ५९ एकर जमीन बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करणे, महसूल विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, पुुनावळे येथील राखीव घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठीची राखीव जागा, अशा प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.

त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आगामी विधानसभेची १० ते १२ दिवसांत आचारसंहिता लागेल. त्यामुळे शहरासंदर्भात राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेले विषय पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. आचारसंहिता ३५ दिवस राहणार असल्याने नवीन सरकार आल्यानंतरच बाकी राहिलेले प्रलंबित विषय मार्गी लावता येतील.

भाजप-शिवसेना दोन्ही पक्षात नेते मोठ्या संख्येने येत आहेत. दोन्ही पक्ष नेत्यांना पक्षात घेत आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार नाहीत. या ‘इनकमिंग’ची युती होण्यासाठी कोणतीही अडचण नसून भाजप-शिवसेना युती नक्की होणार, असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी केले.

यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मंत्री बाळा भेगडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते

Share this: