माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भोसरीत रिव्हर सायक्लोथॉनचे उद्‌घाटन


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भोसरीत रिव्हर सायक्लोथॉनचे उद्‌घाटन

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन भोसरी या संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रिव्हर सायक्लोथॉन हा उपक्रम प्रशंसनीय आहे. रविवारी (1 डिसेंबर 2019) सकाळी 6 वाजता भोसरीतील अंकुशराव लांडगे शेजारील पटांगणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. पर्यावरण व नदी स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महापौर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका उषा मुंढे, उद्योजक कार्तिक लांडगे, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, कार्याध्यक्ष अशोक माने, सचिव दळवी, नगरसेवक सागर गवळी, दिनेश यादव, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. निलेश लोंढे, विश्राम कुलकर्णी, सायकल मित्रचे बाप्पू शिंदे, डॉ. आनंद पिसे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, एक पाऊल भावी पिढीसाठी टाकत अविरत श्रमदान या संस्थेच्या वतीने रिव्हर सायक्लोथॉन हा अभिनव उपक्रम मागील वर्षीही आयोजित करण्यात आला होता. या वर्षी या उपक्रमात ऑनलाईन पद्धतीने 7 हजाराहून जास्त विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. 11 हजारांहून जास्त नागरिक या उपक्रमात सहभागी होतील असेही जाधव यांनी सांगितले.


उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, औद्योगिकीकरणामुळे अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. मात्र, शहराचा विकास होत असताना नदी व प्रदूषणाविषयी समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे हवेबरोबरच पाणीदेखील ब-याच ठिकाणी प्रदूषित होत आहे. याबाबत जनजागृती व्हावी व पुढील पिढीसाठी स्वच्छ पाणी व स्वच्छ नदीपरिसराचे संवर्धन केले जावे या अपेक्षेने आयोजित केलेल्या या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकादेखील सहभागी होत आहे.


सचिन लांडगे यांनी सांगितले की, हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पाहोचविण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये  चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 50 हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.


डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, या उपक्रमात पर्यावरणप्रेमी संस्था, पतंजली योग, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, पिंपरी चिंचवड फार्मासिस्ट असोसिएशन, पिंपरी चिंचवड बार असोसिएशन, वकील संघटना, रोटरी व लायन्स क्लबच्या विविध शाखा, माजी सैनिक संघटना आदीदेखील सहभागी होणार आहेत. रिव्हर सायक्लोथॉनमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी खालील लिंक वापरून रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन डॉ. लोंढे यांनी केले. http://www.aviratshramdaan.com/river-cyclothon
दिगंबर जोशी यांनी सांगितले की, सकाळी 6 वाजता रॅलीचे उद्‌घाटन होईल. यामध्ये पाच किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान पासून सुरू होऊन पुणे नाशिक महामार्गावरून जय गणेश साम्राज्य चौकातून परत गावजत्रा मैदानपर्यंत. 10 किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान ते नाशिक महामार्गावरून जयगणेश साम्राज्य चौकातून डावीकडे वळून स्पाईन रोडने क्रांती चौकातून परत गावजत्रा मैदानपर्यंत आणि 20 किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदानपासून नाशिक महामार्गावरून जयगणेश साम्राज्य चौकातून डावीकडे क्रांती चौक, साने चौक, कृष्णा नगर चौकातून परत त्याच मार्गाने भोसरीतील गावजत्रा मैदानापर्यंत असा राहिल.

Share this: