क्राईम बातम्याबातम्या

हिंजवडीत ‘आयटी’ कर्मचा-यांची आत्महत्या , नातेवाईकांना खुनाचा संशय

वास्तव संघर्ष न्यूज

पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कपिल गणपत विटकर (वय-३९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हिंजवडीमधील टीसीएस कंपनीत ते काम करत होते. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांचा काही दिवसांपूर्वी राहत्या घरात किरकोळ अपघात झाला होता. तेव्हापासून पाठीच्या कण्याचे दुखणे सुरू झाले होते. दरम्यान यामुळे त्यांनी काही दिवस सुट्टी देखील घेतली होती. ते कामावर आले असता टीसीएस या कंपनीत सहाव्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे

कपिल यांच्या गळ्याभोवती प्लास्टिक लॉक टॅग होता. त्यांचे ऑफिस हे तिसऱ्या मजल्यावर आहे. मात्र, त्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन आपली जीवनयात्रा संपवली. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड हे करत आहेत.

आज पहाटे सहाच्या सुमारास कपिल विटकर हे कंपनीत कामाला आले होते. त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.
तिसऱ्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे. मात्र सीसीटीव्ही नाही अशा सहाव्या मजल्यावर संबंधित घटना घडली आहे. त्यामुळे हा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असल्याचं पोलिसांनी सांगितले

Share this: