पिंपरी चिंचवड शहरात त्यांची दहशत ;कार्यवाही करण्यासाठी पालिकाही घाबरते

दिपक साबळे |

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांना एका वेगळ्याच दहशतीला सामोरं जावं लागतं आहे ही दहशत इतकी आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाही त्यावर आवर घालू शकत नाही उलट कारवाई करण्यासाठी पालिकाच घाबरते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही दहशत कोण्या व्यक्तीची नसून शहरातील मोकाट कुत्र्यांची आहे. हल्ली शहरात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या आणि रात्री उशिराने दुचाकी वाहनांवरून घरी जाणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसतो. पालिकेच्या श्वान पथकाकडून कुत्री पकडून त्यांची नसबंदी केली जाते आणि त्यांना पुन्हा सोडले जाते. तरीही शहरातील कुत्र्यांची संख्या आणि त्या तुलनेत पालिकेकडे उपलब्ध यंत्रणेचा ताळमेळ बसत नाही.

मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देणे, श्वान पथकाचे वाहन उपलब्ध करणे, कुत्र्यांची नसबंदी करणे आणि रेबिज लसीकरण करणे अशा स्वरूपाची कामे कधी सुरु करणार आहे . या कामांसाठी पालिकेने काही महिन्यांपूर्वी निविदा काढल्या होत्या. दोनवेळा मुदतवाढ देऊनही केवळ एकाच संस्थेने निविदा भरल्याने पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात पालिकेने पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भूल द्यावी लागते. भूल देण्याच्या औैषधाचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. ही औषधे सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.त्यामुळे मोकाट कुत्री वाढत असून अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असतात अधिकारी मोकाट कुञ्यांवर कारवाई करण्यासाठी घाबरतात की काय अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे.

Share this: