कर्मचारी महासंघाच्या जीवावर बबनराव झिझुर्डे झाले शिपाई ते शंभर एकर जमीनीचे मालक – अंबर चिंचवडे

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्ह्णून बिरुद मिरवणारी आपली महानगरपालिका.. पिंपरी चिंचवड महानगरपालिका.. याच आपल्या महापालिकेत गेल्या १९ वर्षांपासून इथल्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा संकल्प घेतलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाला गेल्या काही वर्षांमध्ये ग्रहण लागले आहे. आणि हे ग्रहण नैसर्गिक नसून काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थापोटी रचण्यात आलेल्या कटाचा एक भाग आहे. आगामी निवडणुकीत बबनराव झिंझुर्डे हे पुन्हा पॅनल प्रमुख म्हणून निवडणूकीत आहेत त्यांचा प्रवास मनपामध्ये एक शिपाई पद म्हणून झाला होता आणि पंधरा वर्षे अध्यक्ष पद भूषविले याच दरम्यान त्यांनी एक दोन नव्हे तब्बल शंभर एकर जमीनीचे मालक झाले आहेत असा गंभीर गोप्यस्पोट आपला महासंघ पॅनलचे प्रमुख अंबर चिंचवडे यांनी पञकार परिषदेत केला.

ते पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आपला कर्मचारी बांधव आणि त्याच्या कुटुंबियांना सवलतीच्या दारात औषधे मिळावीत यासाठी कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून महासंघ मेडिकल नावाने औषध पुरवठा करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी मा. आयुक्तांकडे करण्यात आली. आणि मा. आयुक्त साहेबांनी ती मागणी मान्यही केली. पाच वर्षांच्या करारावर महासंघाला मेडिकल साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यापोटी महासंघाच्या बँक खात्यातून पंधरा लाख रुपये हि त्यावेळी देण्यात आले.

या दिलेल्या रकमेमध्ये मेडिकल आणि त्याचे अंतर्गत फर्निचर ची व्यव्यस्था करणे बंधनकारक होते. आणि याच पैशांच्या तेजाने दिपलेले डोळे घेऊन महासंघातील पदाधिकाऱ्यांना या संधीत स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचा मार्ग दिसू लागला.. यातील काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने मेडिकल संबंधी शॉप ऍक्ट परवाना स्वतःच्या नावाने बनवले तसेच औषध परवानाही स्वतःच्या नावाने काढण्यात आला.. मुळात मनपा अधिनियम व महासंघ घटना व नियमावलीप्रमाणे कर्मचाऱ्यांना नोकरीत असताना कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. तरीही या स्वयंघोषित स्वार्थी अध्यक्षांनी बेकायदेशीरपणे हा व्यवसाय केला. आज ना उद्या यांना कायद्याने शिक्षा होणारच आहे. यांनी कितीही स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही तो निष्फळ ठरेल.


या सर्व प्रकरणात मोठ्या आर्थिक घोटाळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.. आणि या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने महानगरपालिका, धर्मादाय आयुक्त महोदय आणि कर्मचारी बांधवांची मोठी फसवणूक केली.. या सेवादायी व्यवसायातून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कमावलेला नफा कोट्यवधींचा आहे जो त्यांनी कुठेही दाखवणे जाणीवपूर्वक टाळले.. गेल्या साडेतीन वर्षांच्या बँक स्टेटमेंट मध्ये यांनी मेडिकलच्या खात्यावर तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये जमा केल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या रकमेचे साधे लेखापरीक्षणही कुठे केले गेले नाही. साधारण मेडिकल व्यवसायात ३० टक्के जरी नफा गृहीत धरला तरी निव्वळ नफ्याचीच रक्कम जवळपास ९ कोटी रुपयांवर जाते. एवढी मोठी रक्कम कुठलेही ऑडिट न करता कुणाच्या खिशात गेला याच उत्तर सर्व कर्मचारी बांधवाना मिळायलाच हवं.

म्हणूनच या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या कर्मचारी बांधवांच्या आरोपात नक्कीच तथ्य आहे.. अशा कामगारविरोधी ढोंगी आणि फसव्या महासंघ पदाधिकाऱ्यांना आणि स्वयंघोषित अध्यक्षांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आता आलीय. आपला कामगार बांधव एवढा सुज्ञ आहे कि जो त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांसाठी केलेल्या महत्वाकांक्षी योजनेतील घोटाळेबाजांना आणि चोरांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही. यावेळी महासंघाची पोलखोल असे पुस्तक देखील प्रकाशित केले

Share this: