धक्कादायक :कंपनीत घुसून पाच ते सहा जणांनी कंपनीच्या मालकाचा दगडाने ठेचून केला खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) – चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत घूसून पाच ते सहा जणांनी कंपनीच्या मालकाचा दगडाने ठेचून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना सोमवारी ( दि . 17 ) दुपारी तीनचे सुमारास घडली . रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती . हल्लेखोर चाकण परिसरातील अवैध रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत .

हरिश्चंद्र किसनराव देठे ( वय 45 , सध्या रा . विश्रांतवाडी , पुणे , मूळ रा . रुई , जि . उस्मानाबाद ) असे या घटनेत खून झालेल्या कंपनी चालकाचे नाव आहे . या प्रकरणी प्रमोद वशिष्ठ कोल्हे ( वय 27 , रा . आंबेठाण चौक , चाकण , ता . खेड ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी हद्दीत व्ही . एच . डी . इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे . या कंपनीचे मालक हरीश्चंद्र देठे हे असून ते नेहमीप्रमाणे सकाळी कंपनीत आले होते . सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आलेल्या काही जणांशी त्यांचा वाद झाला . त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सहाजण कंपनीच्या गेटवर आले . त्यांनी जोरदार दगडफेक सुरु केली .

कंपनीचे मालक देठे बाहेर आल्यानंतर संबंधित पाच ते सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्यांना खाली पाडून दगडांनी त्यांच्या डोक्यात जबरदस्त मारहाण केली . देठे कंपनीच्या प्रवेशद्वारावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळा वरून पोबारा केला . जखमी देठे यांना तत्काळ येथील एका खासगी रूग्णालयात आणण्यात आले . मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले .

संबंधित कंपनीतील कामगार आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सर्व हल्लेखोर एका प्रवाशी वाहतुकीच्या रिक्षातून घटनास्थळी आले होते ; व हल्ल्यानंतर याच रिक्षातून पळून गेले . हल्लेखोरांपैकी एकाची पत्नी याच कंपनीत कामास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . पोलिसांची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे.

Share this: