‘मी या वस्तीतला दादा आहे’ असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार ;निगडीतील ओटास्कीम येथील घटना

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील एका ‘ भाई’ ने कोयत्याने वार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे . यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे . मी या वस्तीतला दादा आहे ‘ तू मला भाई का म्हणत नाही असा जाब विचारत त्या तरुणावर कोयत्याने वार केल्यानंतर आरोपीने परिसरात आरडा ओरडा करून दहशत निर्माण केली . याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना रविवारी ( दि . 23 ) रात्री आठ वाजता ओटास्किम , निगडी येथे घडली .

सागर शहाजी सावंत ( वय 26 , रा . ओटास्किम , निगडी ) , अंकुश जाधव ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत . याप्रकरणी विशाल विठ्ठल पायाल ( वय 20 , रा . ओटास्किम , निगडी ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी विशाल आणि त्यांचा मित्र रविवारी रात्री ओटास्किम मधील सम्राट हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसले होते . त्यावेळी आरोपी एम एच 14 / एच एक्स 4020 या दुचाकीवरून आले .

आरोपी सागर याने हातात कोयता घेऊन ‘ तू मला भाई का म्हणत नाही . मी या वस्तीतला दादा आहे . तुला वेळोवेळी सांगितले असताना तू माझे ऐकत नाही ‘ असे म्हणत विशाल यांच्यावर कोयत्याने वार केले . विशाल यांच्या पाठीवर , हातावर गंभीर इजा झाली आहे . आरोपी अंकुश याने विशाल यांना शिवीगाळ केली . त्यानंतर आरोपीने दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आरडा ओरडा केला . दहशतीच्या भीतीने लोकांनी आपली दारे खिडक्या लावून घेतली . निगडी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: