बाराशे विद्यार्थ्यांना दिली रुबेला आणि गोवर लस

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाचा उपक्रम

पिंपरी (वास्तव संघर्ष) रुबेला व गोवर लसीकरण मोहिमेअंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात रुबेला लसीकरण राबविण्यात आले. यावेळी नर्सरी ते दहावी पर्यंतच्या बाराशे विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदींसह शिक्षकवृंद, महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.

हाती इंजेक्शन घेतलेल्या परिचारिका आणि नियोजनात रमलेल्या शिक्षिका यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांना रुग्णालयाचे स्वरूप आले होते. लहानग्या विद्यार्थ्यांना लस देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर होते. यावेळी सुई पाहताच चेहरा कावराबावरा करत विद्यार्थी नकार दर्शवित होते. मात्र, पालक, वर्गशिक्षिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात लस टोचण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती, तर अनेक विद्यार्थी हसतमुखाने या प्रक्रियेला समोरे गेले. इंजेक्शन दिल्यानंतर पुढील पंधरा ते वीस मिनिटे विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात होते. ज्या 1200 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली, त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला साईड इफेक्ट झाला नाही.

           दरम्यान, शाळेने पालकांनाही शाळेत बोलावून घेतले होते. त्यांना लसीकरणाविषयी आणि रुबेला रोगाविषयी माहिती देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमच्या माध्यमातून शाळेमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. त्यामुळे या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मनातील भीती दुर झाली.

या लसीकरणाबाबत आरती राव म्हणाल्या, की पालक सकारात्मक असल्याने लस देण्यात कोणतीही अडचण आली नाही. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. आरोग्य सेविकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची पाहणी केली जात होती. पालकांनी शाळेवर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली.

Share this: