कोरोना व्हायरस : ‘ लॉकडाऊन ‘ असताना घराबाहेर पडला म्हणून सख्या भावाचा केला ‘ खून ‘

मुंबई (वृत्तसंस्था) देशात करोना व्हायरसमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांच्या घऱाबाहेर पडण्यावर बंदी आली आहे. लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत लॉकडाउन असतानाही घराबाहेर पडला म्हणून एका व्यक्तीने आपल्याच सख्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. कांदिवलीत हा प्रकार घडला असून . पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला भावाला अटक केली आहे.

समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश लक्ष्मी ठाकूर याने लॉकडाउन आहे त्यामुळे घराबाहेर निघू नको असं वारंवार सांगूनही धाकटा भाऊ दुर्गेश याने न ऐकल्याने त्याची हत्या केली. दुर्गेश पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. करोनामुळे कंपनीतील कामकाज बंद असल्याने तो आपल्या घऱी परतला होता.

दुर्गेश बाहेरुन घरी आला तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्गेशला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Share this: