पिंपरी-चिंचवडमधील खासगी दवाखाने व रुग्णालये बंद ठेवलेल्या डॉक्टरांवर कारवाई करा – सतीश कदम

पिंपरी(वास्तव संघर्ष) ; कोरोना संकट काळात खासगी दवाखाने बंद ठेवलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सतीश कदम यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले असून त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यातून रुग्णालये, दवाखाने यांसारख्या जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले असले तरी पिंपरी-चिंचवड शहरात मात्र वेगळsच चित्र दिसत आहे. शहरातील बहुतांश लहान मोठे खासगी दवाखाने चक्क बंद ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी सेवा देणारे डॉक्टर गायब झाले आहेत. परिणामी आधीच कोरोनामुळे घाबरलेले नागरिक दवाखाने बंद असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयात मोठी गर्दी करत आहेत.

सर्दी-खोकल्यासारख्या किंवा इतर छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना शासकीय किंवा खासगी मोठ्या व महागड्या रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. आधीच शासकीय रुग्णालयात कोरोनामूळे तपासणीसाठी लोकांची मोठी गर्दी झालेली असताना त्याठिकाणी जाण्यासाठी नागरिक काहीसे घाबरत आहेत. मात्र पर्याय म्हणून नागरिकांना हा मार्ग निवडावा लागत आहे. खासगी दवाखाने बंद ठेवल्याने इतर रुग्णालयांवर येणारा ताण पाहता ज्यावेळी नागरिकांना खरी गरज आहे, त्याचवेळी हे दवाखाने बंद करून गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सतीश कदम केली आहे.”

Share this: