महाराष्ट्रलेख-कविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासुर्याची ऊर्जाशक्ती : माता रमाई


डॉ.बाबासाहेब रमाई बद्दल म्हणतात,”रामू तू मला सोडून गेली, तुला मी काहीही सुख दिले नाही.तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या.रमा खरी धनवान आहे.तिची खूप उधारी आहे माझ्यावर.मी कधीही फेडू शकणार नाही.तिने माझ्यासाठी अपार कष्ट सहन केले,उपास काढले.एका वस्त्रानिशी घरात राहिली.मला आमच्या मुलांना वाचविण्यासाठी काही करता आले नाही.हे समाजक्रांतीचे व्रत मी स्वीकारले आहे.

मी माझ्या बौद्धिक व मानसिक
शक्तीस वाढविण्यासाठी एखाद्या योग्याच्या निष्ठेने समाजाच्या उन्नतीला आवश्यक असणाऱ्या सर्वांगीण अभ्यासाची समाधी लावली.दररोज २०-२२ तास अभ्यास केला.पदव्या मिळविल्या.मी प्रकांड पंडित झालो.पण कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही.
रमाई म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावली.बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईनी अत्यंत हलाखीच्या परिसथितीत संसार सांभाळला.

पददलितांच्या आई, रमाईचे २७ मे१९३५ रोजी निधन झाले.स्मृतीदिनानिमित्त रमाईना विनम्र भावशब्दांजली…….
महापुरुषाचे व्यक्तिमत्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते, असे म्हटले जाते कि प्रत्येक पुरुषाच्यामागे एका स्त्रीचा हात असतो.मग ती आई किंवा पत्नी असू शकते.बाबासाहेबांना रमाईची साथ नसती तर कदाचित भिवाचे भीमराव झाले नसते.स्त्री हि सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माताही आहे.युगपुरुष,महामानव डॉ.बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात,दारिद्र्याच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी,सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.


बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हालअपेष्टया ,दुःख, गरिबी सहन केली.एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दुःख नाही.रमाईची मुले औषधाविना मरण पावली.रमाईने अपार कष्ट केले.शेणाच्या गोवऱ्या थापल्या.त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी तसेच बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खर्च करीत.रमाईला शेजारच्या महिला दागिन्यावरून चिडवीत असत.तेव्हा रमाई म्हणत ,”माझा दागिना म्हणजे माझं कुंकू. माझं सौभाग्य असे आहे कि, ज्याची ख्याती साऱ्या विश्वाला ठाऊक आहे.” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठेपणाचे असं नेमक्या शब्दात वर्णन करणाऱ्या रमाईचे हृदय किती संवेदनशील असेल याची प्रचिती येते.त्यांच्यातील या वृत्तीमुळे बाबासाहेब आंबेडकर घडू शकले.


बाबासाहेबांचा सत्कार समारंभात रामाईना नेसायला लुगडे नव्हते.तेंव्हा बाबासाहेबांना मिळालेला फेटा लुगडं म्हणून घातला.गरिबीची केवढी मोठी हि शोकांतिका.एक बॅरिस्टर आपल्या पत्नीला एक लुगडं घेऊन देऊ शकत नव्हते.त्याच बाबासाहेबांमुळे आज आपण चांगले वस्त्र परिधान करीत आहोत.


दि.२७ मे १९३५ ला रमाई जग सोडून जातात.त्यावेळी प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रसंग पुढीलप्रमाणे- “रामू…….रामू……..असा प्रज्ञेच्या सूर्याने हंबरडा फोडला.आणि धाय धाय मोकलून रडू लागला.
रामू तू मला सोडून गेली.तुला मी काहीही सुख दिले नाही.तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्या.फार मोठा त्याग केलास रामू तू.” या घटनेचा बाबासाहेबांच्या मनावर फार मोठा आघात झाला.रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांच्या जीवनात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली होती.
रमाईच्या आठवणीने बाबासाहेब व्याकुळ होऊन म्हणत असत-
रमा खरी धनवान आहे.तिची खूप उधारी आहे माझ्यावर. मी कधीच फेडू शकणार नाही.
बाबासाहेबांच्या अथांग अंतःकरणात रमाईसाठी एक खास स्थान होते.त्यांनी आपला ‘thoughts on pakistan ‘ हा ग्रंथ रमाईस अर्पण केला.त्यातील अर्पणपत्रिका अशी-
“जिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा,
तिच्या मनाचा उदात्तपणा,
तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा,
त्याचप्रमाणे
ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता,
आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा काळ होता.
असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता.
जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर
ते दुःख सहन केले
आणि मजबरोबर तसलेही दिवस कंठले,
म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण ठेवण्यासाठी
हा ग्रंथ तिच्या (रामूच्या) स्मृतीस अर्पण करीत आहे.
सिद्धार्थासारखा त्याग करणारे बोधिसत्व बाबासाहेब आणि यशोधरासारखी त्याग करणारी रमाई……….
रमाई आपल्या सर्वांची आई……तिचा त्याग…..तिची करुणा….. बाबासाहेबांवरील तिची श्रद्धा…….समाजाविषयीचे प्रेम…….आता सगळ्या राहिल्या बाकी आठवणीच…….

लेखक:- रामजी पांडुरंग लांडगे
मो. 9975503054

Share this: