कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील सदस्याला एक पिस्टल आणि दोन काडतुसासह अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) – कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील सदस्य आणि पोलीस रेकोर्डवरील आरोपी असलेल्या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दत्ता उर्फ बबलू मालपोटे (वय 26, रा. कात्रखडक गाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार दत्ता मालपोटे हिंजवडी येथील बापुजी बुवा मंदिराजवळ कोणालातरी भेटण्यासाठी येणार आहे.त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी तरुण चालत मंदिराच्या समोर येऊन थांबला.

पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडले.आरोपी दत्ता याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 26 हजारांचा ऐवज सापडला. पोलिसांनी हा ऐवज जप्त करून त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दत्ता हा कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीचा सदस्य आहे. त्याच्या विरुध्द पौड, कोथरूड, दिघी, लोणावळा पोलीस ठाण्यात खून, दरोडा, अपहरण, शस्त्र अधिनियामान्वये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्ता याने निलेश गावडे आणि इतर साथीदारांच्या मदतीने 2018 मध्ये गजानन मारणे टोळीचा सदस्य राजू कुंभार याचा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी सचिन उगले, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद लांडे, नितीन खेसे, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली आहे

Share this: