चिंचवड येथे घडलेला अपघात नसून घातपात आहे ;मृत व्यक्‍तीच्या नातेवाइकांनी केली चौकशीची मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) चिंचवड येथे मित्रासोबत राञी चालत असताना भरधाव आलेल्या रिक्षाने तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 27) रात्री घडली. पण हा अपघात नसून घातपात आहे असा संशय मृत व्यक्‍तीच्या नातेवाइकांनी केला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करावी अन्यथा मृत देहावर अत्यंसंस्कार करण्यात येणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अत्यंसंस्कार केले.

दीपक सुधाकर गायकवाड (वय 32, रा. मोरया हाऊसिंग सोसासटी, वेताळनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ दत्ता गायकवाड (वय 20, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. लखन प्रताप थोरात (वय 28, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दीपक आणि त्याचा मित्र शंकर तिखे हे दोघेजण जेवण झाल्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी पवनानगर परिसरात गेले. शंकर हा पदपथावरून तर मृत दीपक हा पदपथालगत रस्त्यावरून जात होते.त्या वेळी भरधाव आलेल्या आरोपी सौरभच्या रिक्षाने दीपक यास जोरदार धडक दिली. दीपकला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या दीपकचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दीपक यास त्याचा मित्र शंकरने ढकलून दिल्याने तो अचानक रस्त्यावर आला आणि त्याचा रिक्षाला धडकून अपघात झाल्याचे आरोपी रिक्षाचालक सौरभ याने सुरवातीला सांगितले.मात्र दीपक हा पदपथाच्या कडेने चालला असताना 20 फुटांचा रोड सोडून सौरभ पदपथाच्या शेजारी रिक्षा घेऊन भरधाव का आला, असा प्रश्‍न दीपक यांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.

तसेच दीपक अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मित्र शंकरने त्यास रुग्णालयात नेण्याऐवजी घरी जाऊन आंघोळ केली. कपडे बदलून तो पुन्हा खाली आला.त्याच इमारतीत राहणाऱ्या दीपकच्या नातेवाइकास अपघाताबाबत का नाही सांगितले, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

हा निव्वळ अपघात नसून घातपात आहे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दीपकच्या नातेवाइकांनी केली आहे. जोपर्यंत शंकर याच्यावरही कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. तसेच मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली.अपघाताचा गुन्हा दाखल करून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share this: