पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

भोसरी(वास्तव संघर्ष ) – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचे रिपोर्ट आज सोमवार रोजी (दि.29) पॉझिटिव्ह आले आहेत. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहर भाजपची धुरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा बाहेर मोठ्याप्रमाणात वावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती.

आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे.

त्यांनी चार दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानरपालिकेतील अधिका-यांशी देखील चर्चा केली होती. आयुक्तांच्या एन्टी चेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यामुळे किती जणांची तपासणी करावी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this: