पिंपरी चिंचवडमध्ये आता अर्ध्या तासात मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणा-या एक लाख अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी केल्या आहेत. उद्यापासून या कीटच्या माध्यमातून संशयित नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामुळे जलद निदान, जलद उपचार शक्य होणार आहेत.

कोरोनाला रोखण्यात या कीट महत्वाची भूमिका बजाविणार आहेत. याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली.महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे उद्यापासून एक लाख अँटीजेन टेस्टिंग कीट उपलब्ध होणार आहेत. कोरोनाची लक्षणे असणारे तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅबद्वारे चाचणी होते.माञ आता या कीटचा वापर करुन अशा व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन किटच्या सहाय्याने प्रथम चाचणी करण्यात येणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात या संशयितांना कोरोनाची लागण झाली आहे कि नाही याची माहिती मिळणार आहे.

कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या अँटीजेन टेस्टिंग कीटमुळे स्वॅबद्वारे होणारी चाचणी, त्यासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च वाचणार असून कोरोना प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.प्रामुख्याने या कीटचा वापर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या को-मॉरबिड व्यक्ती, गरोदर महिला, फ्रंटलाईन कर्मचारी व कंन्टेनमेंट झोनमधील व्यक्ती यांच्यासाठी करण्यात येणार आहे

Share this: