क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून पाच दुचाकी आणि एक कार चोरीला

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून पाच दुचाकी आणि एक कार अशी एकूण सहा वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वाहन चोरीची पहिली घटना चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे उघडकीस आली. मोहन विठ्ठल गाढवे (वय 54, रा. किवळे. मूळ रा. संगमनेर, ता. भोर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जुलै रोजी फिर्यादी गाढवे यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 12 आरबी 2680) थरमॅक्स चौक येथे एचडीएफसी बँकेजवळ पार्क केली. गाढवे यांच्याकडून दुचाकीची चावी दुचाकीच्या डिक्कीला विसरून राहिली.

दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. गाढवे यांनी सर्वत्र शोध घेऊन एक महिन्यानंतर 8 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची दुसरी घटना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये घडली. मयूर प्रदीप भालेकर (वय 20, रा. वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेकर यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 डीझेड 3886) सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता लॉक करून पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीचे हॅंडल लॉक तोडून चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची तिसरी घटना वाकड ब्रिज जवळ रानजाई हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली. सुदर्शन बाजीराव कलाटे (वय 38, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलाटे यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच 14 जेसी 4565) वाकड ब्रिजजवळ असलेल्या त्यांच्या रानजाई हॉटेलच्या पार्किंगमध्ये 2 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने चोरून नेली. हा प्रकार 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आला.

दुचाकी चोरीची चौथी घटना एमक्यूअर फार्मासिटिकल कंपनी, हिंजवडी फेज दोन येथे 7 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पावणे सात या कालावधीत घडली. याप्रकरणी युवराज बबन शिंगाडे (वय 33, रा. आंबेगाव पठार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगाडे हिंजवडी फेज दोन येथील एमक्यूअर फार्मासिटिकल कंपनीत नोकरी करतात. 7 ऑगस्ट रोजी ते सकाळी कंपनीत आले. त्यांनी दहा वाजता त्यांची 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 12 क्यूडी 2582) कंपनीच्या गेटसमोर पार्क केली. सायंकाळी पावणे सात वाजता कामावरून कंपनीच्या बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

दुचाकी चोरीची पाचवी घटना पिंपळे निलख येथे घडली. सुनील सुदाम चौधरी (वय 33, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 12 एनटी 0291) 5 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या समोर रोडवर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 6 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

एमआयडीसी भोसरी परिसरातून एक कार चोरीला गेल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली आहे. सचिन इरपान राजमाने (वय 39, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजमाने यांनी त्यांची कार (एमएच 42 ए 2257) 21 मार्च रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. राजमाने यांनी इतर भागात शोध घेतला मात्र, कार न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Share this: