क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

निगडीत जबरदस्तीने घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण;रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने केले लंपास

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरात उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज पळवला. हा प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

हेमलता पाटील (वय अंदाजे 70, रा. एमएसईबी कार्यालयाजवळ, निगडी प्राधिकरण) असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील एमएसईबी कार्यालयाजवळ, निगडी प्राधिकरण येथे एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात. सोमवारी रात्री घरात पाटील एकट्याच होत्या. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांची मुलगी आणि जावई राहतात.

सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी चोरटे पाटील यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी पाटील यांना हाताने मारहाण केली.

यात पाटील जखमी झाल्या. त्यानंतर चोरट्यांनी घरातून 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मंगळवारी सकाळी हेमलता पाटील यांना निगडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. निगडी पोलिसांना मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेमलता पाटील यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके बनवली आहेत. त्यानुसार गुन्ह्याचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड म्हणाले.

Share this: