मयूर जाधव मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीची उडी;आरोपींना अटक करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मयूर भरत जाधव यांच्यावर सोमवारी (दि. 18 ऑक्टोबर) दुपारी वाकड परिसरात काही तरुणांनी चाकूने भोसकून व डोक्यात सिमेंटचे ब्लॉक आणि हातोडीने मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मयूर जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयूर जाधव हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा शहर उपाध्यक्ष असून एक युवा उद्योजक आणि राष्ट्रवादी पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर हल्ला करणा-या आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

परंतू त्यांना अटक झालेली नाही. या घटनेतील हल्लेखोरांना अटक करुन घटनेचा तपास जलदगतीने करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे.

बुधवारी (दि. 27 ऑक्टोबर) संजोग वाघेरे पाटील आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त कार्यालयात याबाबतचे पत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी विशाल काळभोर, शहर पदाधिकारी शेखर काटे, कुणाल थोपटे, अमित लांडगे, प्रतिक साळुंखे, अक्षय माछरे, अजय तेलंग, सागर साळवे, ॲड. अशोक भडकुंभे, प्रतिक जम आदी उपस्थित होते.

Share this: