‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम :आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिनानिमित्त विविध संस्थांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम

पिंपरी(वास्तव संघर्ष) : इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीच्या साक्षीने यशस्वी पार पडली.भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने रविवारी, सकाळी 6वाजता या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदान संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लोंढे, भाजपा प्रवक्ते अमोल थोरात सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.

असा झाली सायक्लोथॉन!

रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्प्यांमध्ये अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने झाली. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी 7किमी मार्यादा होती. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता. दुसरा टप्पा 15 किमी अंतराचा अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य क्रांती चौक- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा पूर्ण करण्यात आला. तसेच, 25 किमी अंतराच्या सायक्लोथॉनसाठी अंकुशराव लांडगे सभागृह- स्पाईन रोड- क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर- अंकुशराव लांडगे सभागृह असा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

इंद्रायणी नदी संवर्धन अन् ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ची जनजागृती…

पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे 12 हजार हून अधिक सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमी नागरिक ‘रिव्हर सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झाले होते. इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासह मोशी येथे साकारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वांत उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ बाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल मोफत देण्यात आले.

गावजत्रा मैदानावर सायकलपटूंचा महासागर : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वांत मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पाहून अभिमान वाटतो. भोसरीच्या गावजत्रा मैदानावर जमलेला सायकलपटूंचा हा सागर नाही, तर महासागर आहे, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपक्रमाचे कौतूक केले.

Share this: