कौतुकास्पद उपक्रम :बाल गुन्हेगारांना ‘खेळाडू’ बनविण्याचा पोलीस आयुक्तांचा ‘निर्धार’

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढली आहे आणि विशेष करून या गुन्ह्यात बाल गुन्हेगारांचे प्रमाण जास्त दिसून आल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून बाल गुन्हेगारांना एक उत्तम खेळाडू बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी बालगुन्हेगार व दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांची शक्ती योग्य मार्गावर यावी या अनुषंगाने ‘विशेष बाल पोलिस पथक’ यांच्या मार्फतीने निगडी ओटा स्कीम व सांगवी येथे क्रीडा उपक्रम राबविण्यात येत असून निगडी ओटा स्कीम येथील राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी चोंदे स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने फुटबॉल खेळाचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.

या कार्यक्रमात बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी या उपक्रमांतर्गत लहान मुलांमधील गुन्हेगारी भावना संपवायची असेल तर त्यांना क्रीडा संजीवनी देणे गरजेचे आहे. खेळातून त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण होते, लहान मुलांमध्ये खूप मोठी ऊर्जा असते. तिला योग्य दिशा दिली तर चांगले व्यक्तिमत्व घडते. मारामारी करून कारागृहात जाण्यापेक्षा चांगल्या संगतीत राहून खेळ खेळून उत्तम खेळाडू व्हा. संगत महत्वाची असते. लहान मुलांमधील गुन्हेगारी संपवायची असेल तर क्रीडाची संजीवनी महत्वाची आहे. तुम्ही दोन पावले चाललात तर आम्ही चार पावले तुमच्यासाठी चालू. ओटास्कीम सारख्या भागातील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत असे बोलून मार्गदर्शन केले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे, पोलीस निरीक्षक शंकर डामसे, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे, प्रशिक्षक संदेश बोर्डे, राजीव भावसार, संपत निकम, भूषण लोहरे आदि उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून राबवत असलेल्या क्रीडा उपक्रमासाठी मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा प्रतिसाद कमी होता. दिवसेंदिवस मुलांचा प्रतिसाद वाढत आहे. आता सुमारे 100 पेक्षा अधिक मुले खेळण्यासाठी येतात. मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या माध्यमातून होत आहे. डॉ. सागर कवडे यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांचे राज्यभर कौतुक होत आहे. भरकटलेल्या पिढीला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे.

निगडीचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी सांगितले की, मागील अडीच महिन्यात ओटास्कीममध्ये केवळ एक शरीराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे. तिथली गुन्हेगारी हळूहळू संपत आहे. हा चांगला उपक्रम असल्याचेही ते म्हणाले. फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश पाटील म्हणाला, “तीन वर्षांपासून मी फुटबॉल खेळत आहे . आम्हाला सुरुवातीला साहित्य मिळाले नाही. पण त्यातूनही प्रॅक्टिस सुरू ठेवली. आता खेळाचे साहित्य व प्रशिक्षण मिळण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. याचा आम्ही चांगला फायदा करून घेऊ.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले.

Share this: