केंद्रीय मंत्री नितिन गडकरींना कवयित्री दिशा पिंकी शेख यांचं खुलं पत्र ।

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगलीमधील शेतकरी मेळाव्यात केलेलं वक्तव्य,

पुणे (वास्तव संघर्ष) “एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली”

असे वादग्रस्त विधान नितीन गडकरींनी सांगलीतील एका कार्यक्रमात केले

शेतकरी मेळाव्यात सिंचनावर बोलतांना गडकरींची जीभ पुन्हा घसरली. ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, अ सं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपा सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,’ असे वादग्रस्त विधान गडकरींनी केले.

मात्र गडकरींच्या ह्या वादग्रस्त विधानावर सामाजिक स्तरावर खुप विरोध होत आहे, त्यातुनचं तृतीयपंथी समाजावर सतत आवाज उठवणा-या कवयित्री दिशा पिंकी शेेख यांनी सोशल मीडिया वर गडकरींंना खुलं पत्र लिहलं आहेे, हेे पत्र जसं च्या तसं आम्ही देेत आहोत.

प्रति
आदरणीय #नितीनगडकरीसाहेब

विषय :- “हिजड्यानी लग्न केली तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही” ह्या तुमच्या विधानाचा निषेध नोंदवणे बाबत…

महोदय,
जय भीम, जय भारत
सर्व प्रथम एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपणास सांगू इच्छिते कि, आपण भारतात राहतो आणि ह्या देशाचं संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या ओळखी सोबत जगण्याचा अधिकार देत, आणि हा सन्मान जर कुणी हिरावून घेत, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा उपहास करत असेल तर तो त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा नाही, तर या देशाच्या संविधानाचा उपहास आणि अनादर आहे. आणि तुम्ही हा गुन्हा केलायत. लोक प्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजांचा आदर करण आणि त्यांना सामाजिक सन्मान बहाल करणं हे तुमच कर्तव्य आहे. जात, वर्ग, लिंग भेदावर आधारलेल्या इथल्या पितृसत्ताक शोषणाच्या बळी पडलेल्या आपल्या समाज व्यवस्थेला या शोषणातून वर काढणं लोकप्रतिनिधींची जवाबदारी आहे. त्याच साठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हिजडा समाजाच्या अस्तित्वाचा त्यांच्यात असलेल्या मातृत्वाचा असल्या घाणेरड्या पद्धतीने उपहास म्हणून वापरणे तुम्हाला शोभले नाही. एखाद्या शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या, सामाजिक स्थरात मागासलेल्या समुदायाचा असा उपहास म्हणून वापर करण त्या समूहाचा अपमान आहे . खरं तर ह्या अपमानाच्या विरोधात तुमच्यावर हिजडा समूहाने मानहाणीचा दावा करायला पाहिजे, पण ह्या देशात तुमच्या सारख्या नेतृत्वनमुळे स्वातंत्र्याच्या सत्तार पंच्याहत्तर वर्षानंतरही माझ्या समूहाच्या भुकेचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून माझ्या भगिनी तुमच्यासारख्यांकडून होणाऱ्या अपमानजनक वागणुकीलाही आपलं नशीब समजून भोगताना आणि जमाजीक अवहेलनेला सामोरे जातात… पण मी शिव, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र्रातील ‘हिजडा’ आहे. हो मी हिजडा आहे. त्यात अपमान वाटण्यासारखा काही नाही उलट हिजडा समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्यासारख्यानी इतिहासातून गायब केलाय, आणि त्याच इतिहासाची मी वारसदार आहे. म्हणून मी तुम्ही जो माझ्या हिजडा समूहाचा त्यांच्या लैगिकतेचा जो उपहास केला त्या कृत्याचा जाहीर निषेध करते,

निषेध!निषेध!निषेध!

तुम्हाला निषेधाची माझी प्रमाण संवैधानिक भाषा समजेल अशी मी आशा बाळगते, आणि अनावधाने तुम्हाला किंवा तुमच्या समर्थक महानपुरुषी व्यक्ती कार्यकर्त्यांना माझं हे पत्र मिळालं तर त्यांनी ते तुम्हाला पोचवावं हि भोळी आशा बाळगते. हे पत्र तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही माफी मागाल किंवा नाही हे तुमच्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन असेल..
किमान परत कधी तुम्ही माझ्या आणि याचं भारताच्या समाजाचा भाग असलेल्या हिजडा समुदायाचा आदर कराल अशी भाबडी आशा बाळगते

धन्यवाद..

आपली मतदार या नात्याने मालक
दिशा पिंकी शेख

मु.पो:- श्रीरामपूर,
जिल्हा:- अहमदनगर,
ता:-श्रीरामपूर

Share this: