उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान-खासदार सुप्रिया सुळे

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.”

खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.”

देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावर भाजपची छाप असल्याचं दिसून येत होतं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे स्टेजवर उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं. या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते.

Share this: