“मेरा भीम जबरदस्त है…. भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांना शहरात प्रथमच राज्यस्तरीय आदरांजली

पिंपरी(वास्तव संघर्ष) :- मानवमुक्तीच्या लढ्याचे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यास्तव अजरामर भीमगीतांचे निर्माण करणारे भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांना आदरांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात राज्यस्तरीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत आज (दि.16) रोजी पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती संयोजकांनी या पञकार परिषदेत दिली ते म्हणाले, ‘भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली हूँ’, ‘महूँ के बच्चे में एक बच्चा’, ‘माझ्या भीमाची नजर’ अशा अनेक प्रसिध्द गीतांमधून उपेक्षित, वंचित समूहाला जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर आणि भीमकुळाचे वारसदार प्रतापसिंग बोदडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. मित्र परिवारात प्रताप दादा म्हणून परिचित असलेले बोदडेदादा यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेवर प्रभुत्व होते. लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य असलेले प्रतापसिंग बोदडेदादा यांनी भीमगीतांचे शेकडो कार्यक्रम सादर केले. प्रतापदादांची शब्दांची फेक आणि गाण्याची लकब अप्रतिम होती.

आंबेडकरांचं महान कार्य आपल्या लेखणीतून त्यांनी उपेक्षित वंचित घटकापर्यंत पोहोचवलं. आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक राहात प्रबोधनाचं कार्य करणारे, मानवमुक्तीचा जागर करण्यासाठी शब्दफुलांच्या प्रखर निखा-यातून आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता घडवणारे आणि ही चळवळ जोमाने पुढे नेणारे कालकथित बोदडेदादा यांचे स्मरण करण्यासाठी सोमवार दि.20 जून 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पिंपरी (पुणे) येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे राज्यस्तरीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रज्ञा इंगळे, साधना मेश्राम, दिपक साबळे, संतोष जोगदंड,श्याम सोनवणे, विशाल ओव्हाळ, धम्मराज साळवे,धीरज वानखेडे, मुन्ना भालेराव, संकल्प गोळे, अमर पुणेकर आदी उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीतील निस्पृह, निष्ठावान, प्रामाणिक आणि सर्वस्व अर्पण करणाऱ्या महाजलसाकार, क्रांती शब्दधुरंदर कालकथित प्रतापसिंगदादा बोदडे यांच्या स्मृतीप्रती संवेदना आणि सहवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच आंबेडकरी चळवळीला अधिक बलशाली आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी चळवळीतील कवी, गायक, कलावंत, कार्यकर्ते आणि अनुयायी सहभागी होणार आहेत. आदरांजलीचा कार्यक्रम प्रतापसिंग दादांच्या गीतांप्रमाणेच प्रबोधनात्मक असणार आहे. यामध्ये दादांबद्दल सम्यक माहिती तसेच दादांच्या प्रबोधनपर गीतांवर आधारित दिशा दाखवणारे व्याख्यान होणार आहे. यावेळी शाहीर डी.आर. इंगळे ( बुलढाणा – विदर्भ ) , डॉ. मिलिंद बागुल ( जळगाव – खान्देश ), डॉ.सत्यजित कोसंबी ( कोल्हापूर ) यांचे व्याख्यान होणार आहे. आंबेडकरी चळवळीची नवी गीते आणि कवीता कशा असाव्यात याबाबत मार्मिक मार्गदर्शन सहभागी व्याख्याते करणार आहेत. तसेच प्रतापसिंग बोदडे दादा यांच्या जीवनावर आधारित जीवनपट सांगणारी गीते सादर होतील. याकरीता महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार, गायक मंडळी यांच्या वतीने गीतगायनाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. या अभिवादन सभेस राज्यातून जास्तीत जास्त संख्यने आंबेडकरी चळवळीतील कवी, गायक, कलावंत, कार्यकर्ते आणि अनुयायी उपस्थित रहावे, असे अवाहन प्रतापसिंगदादा बोदडे अभिवादन समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this: