बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

पिंपरी (वास्तव संघर्ष) :संत तुकाराम नगर येथील सोहम ग्रंथालयातर्फे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तन्मयी देसाई, तहसीलदार पदी निवड झालेल्या तमन्ना शेख यांचा संत तुकाराम नगर येथील सोहम ग्रंथालय व अभ्यासिकेत हा सत्कार करण्यात आला. जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांचे हस्ते हा सत्कार करण्यात आला.

संत तुकारामनगर पिंपरी येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालय 35 वर्षांपासून पिंपरी चिंचवड भागात कार्यरत आहे. ग्रंथालयाची स्वतंत्र आभ्यासिका आहे. ग्रंथालयातुन आजपर्यंत अनेक विध्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडले गेले आहेत. दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबिवले जातात. यावर्षी स्पर्धा परीक्षा तसेच 10 वी व 12 वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. १२ वी उत्तीर्ण झालेल्या कौसर शेख, तन्मय निकम यांचा तसेच १० वी उत्तीर्ण झालेल्या वैष्णवी शिंदे, साक्षी बनसोडे, आरती नलवडे, मानसी वर्मा, आशा चौहान यांचाही उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करून लोकांची मने जिंकणाऱ्या गौरव चौधरी यांचाही सन्मान करण्यात आला.

या वेळी आयएएस झालेल्या तन्मयी देसाई यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तहसीलदारपदी निवड झालेल्या तमन्ना शेख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेविका सुजाता पालांडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, खत्री, किरण सुवर्णा शेठ, अभिजित गोफण, नंदू कदम, सुमन नेरकर आदी या वेळी उपस्थित होते.गौरव चौधरी यांनी सूत्र संचालन केले. संस्थेचे सचिव प्रदीप बोरसे यांनी आभार मानले.

Share this: