हक्कसोड पत्रावर सही न केल्याने लहान बहिणीला रस्त्यात अडवून मारहाण
पिंपरी(वास्तव संघर्ष): मिळकतीच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यासाठी दमदाटी करत लहान बहिणीला आणि तिच्या पतीला रस्त्यात अडवून मारहाण केली. याप्रकरणी सख्ख्या दोन मोठ्या बहिणी आणि एका भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास थरमॅक्स चौकाजवळ घडली.
शारदा उमेश गावडे (वय 54, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनंजय चंद्रकांत सोरटे (वय 32, रा. चाकण), नंदा चंद्रकांत सोरटे (वय 58, रा. चाकण), शोभा सतीश चरवड (वय 55, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा आणि त्यांचे पती मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून थरमॅक्स चौकाकडे जात होते. थरमॅक्स चौकाजवळ कारमधून आलेल्या शारदा यांच्या दोन मोठ्या बहिणी आणि भाच्याने त्यांना अडवले. भाचा धनंजय याने शारदा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शारदा यांनी त्यांच्या बहिणीला चिढण्याचे कारण विचारले असता आरोपी बहिणींनी गाडीतून मिळकतीच्या हक्कसोड करण्याबाबतची कागदपत्रे काढली आणि शारदा यांना त्यावर सही करण्यास दबाव आणला.
कागदपत्रांवर सही न केल्यास इथून पुढे आपला काहीही संबंध राहणार नाही, अशी धमकी बहिणींनी शारदा यांना दिली. नंदा हिने शारदा यांना चप्पलने मारले. भांडण सोडविण्यासाठी शारदा यांचे पती आले असता त्यांना धनंजय याने पट्ट्याने मारहाण केली. शारदा यांनी नातेवाईकांना फोन करण्यासाठी मोबाईल काढला असता ‘जोपर्यंत कागदपत्रांवर सह्या करणार नाही तोपर्यंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तीनही आरोपी कारमध्ये बसून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.