मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा तडा प्रकरणात ‘हे’ प्रमुख किरदार !
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या १०० फूट उंचीच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले आहे. कांस्य धातूचे ते भाग निकृष्ट दर्जाचे बनविले असल्याचे स्पष्ट होत आहे. या कामात भ्रष्टाचार करणारे महापालिकेचे स्थापत्य विभागाचे अधिकारी, निवृत्त कार्यकारी अभियंता संजय घुबे, ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन, शिल्पकार सुनील राम सुतार, सल्लागार क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा. लि. यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
रमेश वाघेरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्याकडेही तक्रार केली आहे. वाघेरे म्हणाले, की मोशी येथे पुतळा उभारणीच्या कामात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले गेले नाही. उंच पुतळा उभारण्याचा अनुभव नसलेल्या ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शनला काम देण्यात आले आहे. त्या ठेकेदाराने भोसरीतील शीतलबाग येथील १७ लाखांचा पादचारी पुलाचे काम ७ कोटी ५० लाख रुपयांवर नेले होते. अशा प्रकारे महापालिकेची लूट करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा काम देऊ नये यासाठी ९ जून २०२० ला पत्र दिले होते.
मात्र, राजकीय दबावामुळे वादग्रस्त ठरलेल्या धनेश्वर कन्स्ट्रक्शनलाच महापालिकेकडून काम बहाल करण्यात आले. त्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळ्याच्या पायातील मोजडीस तडे गेले आहेत. ते काम अस्वच्छ ठिकाणी केले जात आहे. पुतळ्याचे सुटे भाग उघड्यावर कसेही कोठेही ठेवण्यात आले आहेत.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. त्याप्रमाणे दुर्घटना येथे घडू शकते. मोशी येथील पुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार झाला असून, अधिकाऱ्यांसह ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार यांच्यावर कारवाई केली जावी, अशी तक्रार त्यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी खोटी माहिती दिली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी फेसबुक लाईव्ह करून आयुक्तांचा खोटेपणा उघड करत वास्तव समोर आणले होते.