बातम्यामहाराष्ट्र

आपला विजय केलेल्या कामामुळे झाला आहे त्यामुळे आपण कॉलर उडवत असतो-उदयनराजे भोसले

सोलापूर :सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंनी म्हणाले की, मला वंचित हा शब्दच आवडत नाही, ज्यांनी तुम्हाला तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं आहे, त्यांना बाजूला काढून वंचित ठेवा, असा टोला राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.

आज जातीनिहाय आरक्षण देऊन समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्वच आरक्षण रद्द करा. अन्यथा सर्वांना समान आरक्षण देण्यात यावं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आरक्षणामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्यात यावं, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.

सोशल मीडियावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नावाचं पोस्टर समर्थकांकडून वायरल केलं जात आहे. ‘आपल्याला सत्तेची खाज नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे’ असं उत्तर यावर उदयनराजेंनी दिलं. आपल्यापेक्षा जास्त तज्ज्ञ लोक आहेत, असं म्हणत आपण यासाठी इच्छुक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रकारांना सर्वच क्षेत्रातलं ज्ञान असतं, त्यामुळे देशाचा पंतप्रधान हा पत्रकार असावा, असे उदयनराजे म्हणताच एकच हशा पिकला. याच पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर निशाणा साधला. कॉम्प्युटरसारखी अत्याधुनिक वस्तू जर हॅक होऊ शकत असेल, तर ईव्हीएम डबडं आहे. मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन का हटवण्यात आली? असं म्हणत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. याच ईव्हीएममुळे आपला विजय झाला असला तरी आपला संशय कायम आहे. आपला विजय केलेल्या कामामुळे झाला आहे आणि त्याचमुळे आपण कॉलर उडवत असतो अन्यथा लोकांनी आपली कॉलर काढली असती आणि मला चायनीज कॉलरची शर्ट घालावी लागली असती, असं आपल्या शैलीत उत्तर दिलं

Share this: