अनधिकृत पथारीवाले आणि अघोषित आठवडीबाजारा विरोधात स्वाक्षरी मोहीम ;थेरगाव सोशल फौंडेशनचा उपक्रम

पिंपरी (वास्तव संघर्ष) – चिंचवड येथील डांगे चौक थेरगाव येथील अनधिकृत पथारीवाल्यांचे अतिक्रमण आणि रविवारी भरवण्यात येणारा अघोषित आठवडीबाजार या विरोधात आज ( दि . २३ ) थेरगाव येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली . रस्त्याच्या मध्यापर्यंत दुतर्फा उभे राहणारे गाडे आणि फळ व भाजीपाला विक्रेत्यांमुळे चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते . तसेच पादचारी मार्गावरून देखील सामान्य नागरिकांना चालण्यासाठी कसरत करावी लागत आहे . यामुळे ही मोहीम घेण्यात आली आहे.

डांगे चौक थेरगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून याला जबाबदार असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत असलेले पथारीवाल्यांचे अतिक्रमण आणि रविवारी भरवण्यात येणारा अघोषित आठवडीबाजार या विरोधात आज ( दि . २३ ) थेरगाव सोशल फौंडेशनकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली . चौकात भरवण्यात येणारा आठवडी बाजार हा अधिकृत नसून पालिकेची कोणतीही लिखित परवानगी या बाजाराला देण्यात आलेली नाही .

या बाजारामुळे डांगे चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते तसेच चोरी आणि महिला छेडछाडीचे प्रकार वारंवार घडत असतात व गाळेधारकांकडून राजरोसपणे हफ्ते गोळा केले जातात . याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त श्रावण हर्डीकर यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे , असे थेरगाव सोशल फौंडेशनचे पदाधिकारी सांगतात .

दरम्यान, हा बाजार बंद करावा नाहीतर पालिकेने बाजारासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून द्यावी किंवा चौकात सुरु असलेले ग्रेड सेप्रेटरचे काम तात्काळ बंद करावे , अशी मागणी थेरगाव सोशल फौंडेशनने केली आहे .

Share this: