बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महाराष्ट्रातील भाजपच्या आदोलनानिमित्त शहर भाजप – राष्ट्रवादीत जुंपली ;महाराष्ट्र द्रोह्यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही

राष्ट्रवादीची भाजपाच्या आंदोलन नौटंकीवर पत्रकार परिषदेत सडकून टीका

पिंपरी(वास्तव संघर्ष) :- संपूर्ण महाराष्ट्र आणि पिंपरी-चिंचवड शहर करोनामुळे अडचणीत आलेले असताना मोदी भक्तांनी आपले मानधन मुख्यमंत्री निधीला देण्याऐवजी पंतप्रधान निधीला देऊन महाराष्ट्राशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी द्रोह करणार्‍या भारतीय जनता पक्षाने राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमाविला आहे. महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या आडून आपल्या बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी आंदोलनाची नौटंकी भाजपाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून भाजपाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा संतप्त शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपावर टीका करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रात घेतलेल्या भाजपच्या आदोलनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपली आहे.

 भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र बचाव हे हास्यास्प आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची पोलखोल केली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, जावेद शेख, पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवांत, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना वाघेरे म्हणाले, भाजपाने जे आंदोलन हाती घेतले आहे तेच मुळत: हास्यास्पद आहे. संपूर्ण राज्य करोनामुळे हैराण आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून करोना आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री करोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक नागरिक बरे होऊन घरी गेले आहेत. मोफत अन्नधान्य, क्वारंटाईन नागरिकांना सुविधा देण्याबरोबरच आरोग्य व वैद्यकीय सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यातील आरोग्य, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले लाखो कर्मचारी अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांना यामध्येही राजकारण सुचते ही बाबच दुर्देवी आहे.

 राज्य आर्थिक अडचणीत असतानाही राज्याची तिजोरी जनतेसाठी खुली करून आरोग्य व वैद्यकीय सुविधा, अन्नधान्य आणि रेशनधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र विरोधासाठी विरोध करणार्‍या भाजपाला आणि राज्यपालांना या महामारीमध्येही राजकारण करण्याचा मोह आवरता येत नाही. आजपर्यंत या पक्षाच्या माध्यमातून करोना अटोक्यात आणण्यासाठी एकही उपाययोजना केली नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. या महामारीमध्येही हे लोक पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारनोंदणीसाठी नगरसेवकांकडे आग्रही आहेत. शहरातील करोना बाधितांसह नागरिकांच्या सुविधांसाठी प्रत्येकाने आज काम करण्याची गरज असताना आंदोलन आणि राजकारण करण्यातच यांना धन्यता वाटत आहे.

  केंद्र शासनाकडे अनुदानापोटी राज्याचा करोडो रुपयांचा निधी थकला आहे मात्र त्याबाबत यांचे नेते एक ब्र शब्द काढत नाहीत. उलट यांचे नगरसेवक, आमदार राज्याशी द्रोह करून पंतप्रधान निधीला येथील जनतेच्या पैशातून मिळालेले मानधन देत आहेत. येथील जनतेचा पैसा येथेच वापरण्यात काय हरकत होती? मात्र यांना अंध मोदीभक्तीपुढे राज्यातील जनतेची दुख: दिसत नाहीत. महाराष्ट्रापेक्षा सहा कोटींनी लोकसंख्या कमी असलेल्या गुजरातमध्ये करोनाने हाहाकार माजविला आहे. मात्र त्याबाबत यांच्या देशातील आणि राज्यातील नेत्यांना गुजरातमध्ये सर्वकाही अलबेल दिसत आहे. केवळ मोदी आणि शहांना खुश करण्यासाठी आंदोलनाची नौटंकी सुरू असून येथील जनता भाजपाचे हे इव्हेंट ओळखून असल्याचेही वाघेरे म्हणाले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराला ऊत

          पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी करोनाच्या नावाखाली भाजपाच्या नेत्यांनी केवळ भ्रष्टाचार आणि महापालिकांची लूट चालविली आहे. शासनाकडून आलेल्या धान्यातून जेवणाचे वाटप झाले मात्र भाजपाचे स्थानिक नेते त्यावरही स्वत:चे लेबल लावून राजकारण करीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचारा करोनाच्या नावाखाली खरेदी करून केला आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही, मात्र जनतेच्या अडचणी मांडणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचा धर्म आणि कर्तव्य आहे.

          शहरातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने जेवण मिळत नाही, वायसीएममध्येही तशीच परिस्थिती आहे. बालेवाडी येथेही अडचणींचा डोंगर आहे. मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या बगलबच्च्यांना जेवणाची कंत्राटे देण्यातच सत्ताधार्‍यांना धन्यता वाटत आहे.

एका दिवसाच्या एका व्यक्तीचे जेवण, नाष्टा आणि चहाचे तब्बल 480 रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. करोनामध्ये जेवणातही लूट करणे हाच खरा भाजपवाल्यांचा धंदा आहे. वायसीएमसाठीच्या मशीनरी, साहित्य, औषधे, सॅनिटायझर, मास्क, साबनासह इतर खरेदीतही प्रचंड भ्रष्टाचार करून या लोकांनी करोनाच्या महामारीतही मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील जनता यांना कधीच माफ करणार नाही. राज्य शासनाचे आदेश असतानाही आता स्थायी समितीच्या माध्यमातून वाढीव बिले, अनावश्यक कामांना मंजूरी देण्याचा सपाटा सुरू आहे. आयुक्तांनी राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सत्ताधार्‍यांच्या दबावाला भिक घालून चुकीची कामे केल्यास त्यांच्याबाबतीत राज्य शासनाकडे आम्ही तक्रार करणार असून न्यायालयातही दावा दाखल करणार आहोत. येत्या आठ ते दहा दिवसांत खरेदीतील सर्व भ्रष्टाचार पुराव्यानिशी जनतेसमोर सादर करणार आहोत.

          इतरांना वैद्यकीय सुविधा उलब्ध करून द्या

सध्या वायसीएम रुग्णालय करोनासाठी केल्यामुळे सर्वरोग निदानासाठी महापालिकेचे एकही सर्व सुविधा असलेले रुग्णालय उपलब्ध नाही. डीवाय पाटील रुग्णालयात सुविधा दिल्याचे सांगण्यात येत असले तरी तेथील वस्तुस्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णांची हेळसांड सुरू आहे. महापालिकेने तात्काळ सर्वोपचार सुविधांचे एक रुग्णालय करोना व्यतिरिक्त आजारांसाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना सुविधा मिळेल. आम्हाला करोनासारख्या महामारीमध्ये राजकारण करायचे नाही. विना भ्रष्टाचार आवश्यक साहित्य घेण्यासही हरकत नाही. मात्र स्वस्वार्थापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची आवश्यक आहे. भाजपाने भ्रष्टाचार न रोखल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी झगडण्याची गरज भासल्यास आम्ही ते करण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचेही संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.

Share this: