लेख-कविता

देश नही बिकने दुगा” म्हणणाऱ्यांनी देश विकायला काढलाय …

गेल्या 2014 लोकसभेत मोदींनी अनेक आश्वासने देऊन, जाहिरातबाजी करून नरेंद्र मोदी सत्तेत आले. हळू हळू देशातील अनेक मीडिया संस्थाने ताब्यात घेतली, आणि पद्धतशीर लोकशाहीचा चौथा स्तंभ उध्वस्त केला. आज ते पत्रकार, मीडिया संस्थाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ब्र देखील काढायला तयार नाही. जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर देशद्रोहाचा ठप्पा बसवला. फेक न्यूजच्या आधारे विरोधकांचे बदनामीकरण केले. हे सर्व सुरु असताना मोदींनी भाषणाचा तडाखा लावला त्यावेळी त्यांनी अलका कुबल पासून अनेक भूमिका साकारल्या. त्यावेळी त्यांनी मोठा गाजावाजा केला होता की, “देश नही बिकने दुगा”. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाचे प्रतीक लाल किल्ला सुद्धा सोडला नाही.

2018 मध्ये केवळ 25 कोटी साठी लाल किल्ला डालमिया ग्रुपला भाड्याने देणारे कोण होते? गेल्या वर्षी सरकारने तोट्यात असलेल्या 19 मोठ्या सरकारी कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी 25 हुन अधिक कंपन्यांना निर्गुंतवणुकीस म्हणजेच सरकारी गुंतवणूक काढून घेण्यास (विकण्यास) परवानगी देणारे कोण होते? जी रेल्वे एकेकाळी भरभराटीस होती ती रेल्वे दोन दिवसांपूर्वी 109 रेल्वे मार्गावर 151 खाजगी रेल्वेस परवानगी दिली, अर्थात रेल्वेचा मोठा भाग विकला हे कुणाच्या नेतृत्वा खाली झाले? तोट्यात नसतानाही सरकारला भरभरून उत्पन्न करून देणारी आणि दुसऱ्याला विकत घेऊ शकणारी भारतीय विमा कंपनी (LIC) कोणी विकली? देशातील 25 विमानतळाच्या खाजगीकरणाचा घाट कोणी घातला होता? फायद्यात असणाऱ्या 14 विमानतळापैकी 5 विमानतळे अदानी ग्रुपला 50 वर्षासाठी भाड्याने देणारे कोण होते?

सरकारी वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्या नंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सर्व सरकारी हिस्सेदारी विकण्याची घोषणा कोणी केली होती? महाराष्ट्रातील 25 किल्ले हेरिटेज हॉटेल, लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय कुणाच्या सरकारने घेतला होता? विमान बनवण्याचा 80 वर्षांचा अनुभव असणारी सरकारी HAL कंपनी, जी बंद पडण्याच्या मार्गावर आहे, ती सोडून अवघ्या दहा दिवसापूर्वी स्थापन झालेल्या अंबानीच्या कंपनीला राफेलचे कंत्राट देऊन कोट्यवधींचा नफा मिळून देणारे कोण होते?

BSNL आणि MTNL सारख्या महत्वाच्या सरकारी कंपन्यांना मदत सोडून अंबानीच्या जिओ कंपनीला सूट देणारे कोण होते?हेच काय तर एवढं सगळं विकून, भाड्याने देऊन सुद्धा भारतीय रिझर्व बँकेने (RBI) रिझर्व ठेवलेले 1.76 लाख कोणी घेतले? ज्यासाठी अभ्यासू गव्हर्नरांना दोन वेळा राजीनामा देण्यास भाग पडले. यासर्व परिस्थितीत असा प्रश्न पडतो की, गीतकार प्रसून जोशी यांचे “सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा” हे गीत म्हणून मोदीजी देशवासीयांची दिशाभूल कशासाठी करत आहेत.


रामजी पांडुरंग लांडगे
मो. 9975503054
Share this: