पिंपरी चिंचवड महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव; कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण

पिंपरी(वास्तव संघर्ष ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आजवर सुमारे 65 आधिकारी- कर्मचारी याना कोरोना बाधा झाली आहे.यामध्ये पालिकेतील कोरोना वाॅर रूममधील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता महापौर कक्षातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एका कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल आज पॉजिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे महापौर कक्षातील इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे.

महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर महापौरांचा कक्ष आहे. येथे दिवसभर अनेकांची वर्दळ असते. महापौर कक्षाला लागूनच विरोधी पक्षनेते व स्थायी समिती कक्ष आहे. महापौर कक्षामध्ये महापौर ट्रस्टचे काम पाहण्यासाठी एक महिला आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी त्रास होत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज आला असून तो पॉझिटिव्ह आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचे काम रुग्णालयातील बिलांसंदर्भात आहे. त्यामध्ये सर्वच काम कागदोपत्री केले जाते. एकही काम संगणकाच्या माध्यमातून केले जात नाही. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून फाईल आल्या. त्याच पुढेही अनेकांकडे गेल्या. त्यामुळे आता ज्यांच्यापर्यंत या फाईल पोहचल्या आहेत. त्यांना ट्रेसिंग करणे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता महापौरांच्या कक्षातही करोनाचा शिरकाव झाल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

Share this: