पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी ;ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन
पिंपरी(वास्तव संघर्ष) :राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे आज कोरोनामुळे निधन झाले . पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली . राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत दत्ताकाका साने यांच्यानंतर धडाडीची तोफ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जावेद शेख यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादीला पंधरा दिवसांत हा दुसरा मोठा झटका बसला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक असलेल्या जावेद शेख यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती . त्यांच्यावर सुरुवातीला आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते .
मात्र 21 जुलैपासून त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांच्या प्लाज्मा थेरपीचाही वापर करण्यात आला होता . मात्र निमोनियाही झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते . यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते . सातत्याने खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती . जावेद शेख यांच्या लढवय्या वृत्तीमुळे ते करोनावर मात करतील , असे सांगण्यात येत होते . मात्र , त्यांची करोनाविरोधातील लढाई आज ( शुक्रवारी ) पाचच्या सुमारास संपुष्टात आली . त्यांना पाच वाजता मृत घोषित करण्यात आले . जावेद शेख यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे .