दापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या मुंबई – पुणे महामार्गावरील दापोडी येथे मुळा नदीवरील अस्तित्वात असलेल्या जुन्या हॅरिस पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण झाले असून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुण्याकडून मुंबईच्या बाजूस जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन उपलब्ध होणार असल्याने वाहतूक सुरळीत होऊन दापोडीतील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

हॅरीस पुलाचे संरक्षक कटडे तुटले होते. पुलाची अवस्था बिकट झाली होती. दिशादर्शक फलक गायब झाले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 6 मार्च 2019 रोजी पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. पुलाची दुरुस्ती, पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याने पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अपक्ष आघाडीचे गटनेता कैलास बारणे, नगरसेविका माई काटे, नगरसेविका आशा शेंडगे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबसे, प्रभाग अधिकारी संदीप खोत, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Share this: