पिंपरी-चिंचवड शहरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या खेळास परवानगी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड शहरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चालणे, धावणे, सालकलिंग, योगा, स्केटींग, झुम्बा या खेळाच्या सरावास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.5) परवानगी दिली आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमितपणे सराव करता येणार आहे, असे उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले.

शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान व स्टेडिमय खुले करा, अशी मागणी उपमहापौर हिंगे यांनी पूर्वीपासून लावून धरली आहे. त्याबाबत त्यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे दोन वेळा निवेदन ही दिले होते. अखेर, त्या पाठपुराव्यास यश आले आहेे. उपमहापौर हिंगे यांच्या मागणीस आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमहापौर हिंगे यांनी सोमवारी आयुक्त हर्डीकर यांच्या समवेत एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात आयुक्तांनी काही खेळांचा सराव करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. तेव्हापासून शहरातील खेळाची मैदाने, स्टेडिमय व क्रीडांगणे बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंचा सरावही बंद आहे.

खेळाडूंचा सराव चालू झाल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. त्यांना कोरोनासारखा आजार होण्याची शक्यता कमी होईल. जे खेळ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून खेळता येईल, अशा खेळांना परवानगी द्यावी, अशी मागणी उपमहापौर हिंगे यांनी आयुक्तांकडे केली.

चालणे, धावणे, सालकलिंग, योगा, स्केटींग, झुम्बा या खेळाच्या सरावास आयुक्त हर्डीकर यांनी तत्वत: परवानगी दिली आहे. ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ अ‍ॅपवर फिट-पीसीएमसी हे अ‍ॅप्लिकेशन तयार करावे. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने व्हिडीओ शेअर करावेत. त्याचा फायदा शहरातील प्रत्येक खेळाडूंना होईल, अशी चर्चा बैठकीत झाली. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

बैठकीस निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे प्रमुख मनोज देवळेकर, डॉ.डी.वाय.पाटील हायस्कुलच्या मुख्याध्यापिका मृदृला महाजन, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, प्रवीण तुपे, क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त संदीप खोत, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, पालिकेचे क्रीडापर्यवेक्षक व अधिकारी उपस्थित होते

Share this: