वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा (वास्तव संघर्ष) :वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी उदयनराजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी साताऱ्यातील कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते . साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत उदयनराजे जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील केली होती.

त्यानंतर शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाचे भागवत कदम यांनी केलेल्या तक्रारीवरुन अ‍ॅड . बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर..

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, मराठा संघटना आक्रमक होताना दिसतायत . त्यांच्यात कलह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रील वातावरण बिघडू नये यासाठी आम्ही 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत . ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले होते .

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्राला आतापर्यंत खुप चांगले नेतृत्व दिले आहे. ते नेतृत्त्व सगळ्यांचा विचार करणारे होते. आता जे नेतृत्व करत असल्याचे दाखवत आहेत ते खुजे आहेत. स्वतःच आस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत. आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी फोन करुन 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यानुसार 10 तारखेच्या बंदला आमचा पाठिंबा असेल. हा पाठिंबा देताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वेगळं आहे हे समजताच तो आम्ही त्यांना सांगितले आहे आणि ओ बी सी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आम्ही सांगितलं आहे, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले होते.

Share this: