खासदार अमोल कोल्हेंच्या नावावर बिल्डरांची फसवणूक;आरोपीला पोलिसांनी केली अटक

पुणे(वास्तव संघर्ष) : हॅलो मी खासदार अमोल कोल्हे बोलतोय.. अशी बतावणी करून पुण्यातील एका बिल्डरला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने देखील फोन करून फसवणूक या आरोपीने केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

विशाल अरुण शेंडगे (वय ३२, रा. टिळेकर नगर, कोंढवा) आणि सुरेश बंडू कांबळे (रा. गंज पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा (रा. वानवडी) यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात गेरा बिल्डर्स यांना खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगत आरोपी शेंडगे याने फोन केला होता. नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना त्याने फसविण्याचा प्रयत्न केला. याबाबत गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी कोल्हे यांच्या नावाने फोन करणारी व्यक्ती शेंडगे असल्याचे समोर आले.

त्यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपी शेंडगे याला अटक केली . त्याला मदत करणारा आरोपी कांबळे याचा शोध सुरू आहे. आरोपी शेंडगे याने याआधी आमदार चंद्रकांत पाटील व त्यांचा पीए असल्याचे सांगून नागरिकांना फोन करून पैसे उकळले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहे.अधिक तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Share this: