क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तडीपार गुंड आता देऊ शकणार नाहीत पोलिसांना चकवा ;या ॲप्लिकेशनद्वारे पोलीस ठेवणार तडीपारांवर वाॅच

पिंपरी (वास्तव संघर्ष):-पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सेवा उपक्रम , एक्स ट्रॅकर उपक्रम आणि विविध सोशल मीडिया पेजेसचा लोकार्पण सोहळा आज ( शुक्रवारी , दि . 5 ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चिंचवड रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये पार पडला .पिंपरी चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगारांवर शहरातील पोलीस स्मार्ट पद्धतीने लक्ष ठेवणार आहेत . त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एक्स ट्रॅकर हे नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे . शहरातील तडीपार गुंड हे शहरातून तडीपार होऊन देखील ते पोलिसांना चकवा देऊन शहरात सर्रास वावरतात आणि पुन्हा एखादा गुन्हा करून फरार होतात. एक्स ट्रॅकर या ॲप्लिकेशनमुळे तडीपार केलेल्या गुन्हेगारांना त्यांचे रोजचे अपडेट पोलिसांना द्यावे लागणार आहे . तडीपार केलेल्या गुन्हेगाराला ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले आहे , त्याने तिथून दररोज आपला सेल्फी फोटो आणि करंट लोकेशन पोलिसांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनमुळे आता तडीपार गुंडाची खैर नाही ते जिथे असतील तीथे पोलीस त्यांना ट्रॅक करणार आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या 15 पोलीस स्टेशन आहेत . शिरगाव , रावेत आणि म्हाळुगे या तीन पोलीस ठाण्यांना नव्याने मंजुरी मिळाल्याने शहर पोलीस हद्दीत आता 18 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे . त्या सर्व पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले असून त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले .

या कार्यक्रमप्रसंगी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे , खेडचे आमदार दिलीप मोहिते , पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्त अजित पवार , पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते

एक्स ट्रॅकर अप्लिकेशन , सेवा उपक्रमाचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केले . स्मार्ट पोलिसिंगचे सादरीकरण उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले . चिखली , तळेगाव एमआयडीसी , दिघी , आळंदी , निगडी पोलीस ठाण्यांना टॅबचे वाटप करण्यात आले . महसेतुचे सीईओ ओंकार गौरीधर , सीईओ शशी भट , प्राचार्य किशोर रवंडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला . डॉ.अमरनाथ वाघमोडे यांना प्रातिनिधिक हेल्थ कार्ड देण्यात आले .

सहायक पोलीस आयुक्त आर आर पाटील बदली झाल्याबद्दल त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले . अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आभार मानले .

Share this: