बातम्या

बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरात बांधकाम कामगारांच्या हितासाठी लढणारे बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत मारुती शिंदे यांचे वयाच्या (62) व्या वर्षी अल्पशा आजाराने बुधवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे . त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी मध्यरात्री शिंदे यांना अर्धांगवायूचा झटका आला. उपचारासाठी आकुर्डी येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि दुपारी पाचच्या सुमारास त्यांची प्राण्यज्योत मालवली. शिंदे हे मूळचे अकोला तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे होते.त्यांच्यावर निगडी येथील स्मशानभूमीत आज गुरुवारी (20)रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

2010 मध्ये त्यांनी बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार सेना नावाची स्वतंत्र संघटना स्थापन केली . पिंपरी चिंचवड शहरात या संघटनेचे रोपटे शिंदे यांनी लावले. आज सुमारे १५ हजारावर बांधकाम कामगार या संघटनेचे सदस्य आहेत. तत्पूर्वी या कामगारनगरीत बांधकाम कामगार दुर्लक्षित होते. जयंत शिंदे यांनी संघटनेच्या माध्यमातून हजारो कामगारांना शासकीय योजनांचे आर्थिक लाभ मिळवून दिले.

बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पुस्तक संच, शालेय साहित्य तसेच कामगारांना साहित्य खरेदीसाठी अनुदान, अपघाती मृत कामगाराच्या वारसाला बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून शासकीय मदत आदी अनेक योजनांचे लाभ त्यांनी कामगारांपर्यंत पोहचवले.

Share this: