बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

खुशखबर…! लाडकी बहीण योजनेचे बँकांनी कापलेले पैसै मिळणार परत

पुणे(वास्तव संघर्ष ) : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी दिले होते. मात्र, तरीही बँकांनी रक्कम कापल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात तक्रारीही आल्या असून, बुधवारी राज्यस्तरावर झालेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत बँकांनी पैसे कापू नये याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ला पत्र लिहिण्यात येणार आहे. तसेच लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला.लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत.

त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सर्व बँकांना केली होती. तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून, तशा तक्रारीही आल्या असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर आता यासंदर्भात थेट आरबीआयलाच पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या लाभार्थ्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंतीही करण्यात येणार असल्याचे अनुप कुमार यांनी बैठकीत सांगितले. लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना आर्थिक साहाय्य करणे आहे. परंतु, इतर योजना जसे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पहिले दोन हप्तेदेखील मिळाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

Share this: