बातम्या

निळ्या पूररेषेतील बांधकामे होणार निष्कासित

 

पिंपरी, दि. २३ ऑगस्ट २०२४ – शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रालगत असलेल्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे येत्या आठ दिवसात क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण करून बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या निष्कासनाच्या कारवाई दरम्यान आवश्यक असणारी सर्व सुरक्षा यंत्रणा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले. 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात नदीलगतच्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी पवना, मुळा, इंद्रायणी नदीपात्रात शहरातील निळ्या पुररेषेमध्ये असणारी बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चिंचवड येथे नियोजन बैठक पार पडली.  

या बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, महापालिका उप आयुक्त मनोज लोणकर, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप डोईफोडे तसेच संबंधित अधिकारी आणि  कर्मचारी उपस्थित होते.

शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या धरण क्षेत्रासह शहरी भागात होणारा पाऊस तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे अनेकवेळा शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यादृष्टीने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक खबरदारीसह विविध उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पोलिस प्रशासन निष्कासन कारवाई दरम्यान पुरवणार सुरक्षा 

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील निळ्या पुररेषेतील सर्व बांधकामे निष्कासित करण्याचे नियोजन बैठकीत निश्चित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या निष्कासनाच्या कारवाई दरम्यान आवश्यक असणारी सर्व सुरक्षा यंत्रणा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल

Share this: