बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीमध्ये संविधानदिनानिमित्त येणार अभिनेते महेश कोठारे

पिंपरी(वास्तव संघर्ष) : जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीचा गाभा म्हणजे भारतीय संविधान. या संविधानाची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 26 नोव्हेंबर या दिवशी ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी केले आहे.संविधान दिवसाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने दि.26आणि 27 नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

तदनंतर, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी 11 वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सकाळी 11.15 वाजता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार असून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणा-या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे. सकाळी 11.45वाजता सप्तखंजिरीवादक पवन दवंडे यांचा  लोकप्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 2 वाजता कविसंमेलन होणार आहे. दुपारी 4.30वाजता ‘माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने’ या विषयावर महाचर्चा आयोजित केली असून यामध्ये चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे, अभिनेते संदीप पाठक आणि अभिनेते राजकुमार तांगडे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन वृत्तवाहिनी निवेदक प्रसन्न जोशी करणार आहेत. सायंकाळी 6:30 वाजता अश्वघोष आर्ट अँन्ड कल्चरल फाऊंडेशन संचलित कबीर नाईकनवरे यांचा गीत, संगीत आणि निवेदनातून भारतीय संविधानाची जनजागृती करणारा प्रबोधनात्मक गीतांच्या महाजलसेचा ‘सलाम संविधान’ हा कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी 6.30 वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये धीरज वानखेडे, मंजुषा शिंदे आणि संकल्प गोळे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता महिला बचत गट मेळावा आणि  दिव्यांगासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.  सकाळी 11 वाजता ‘भारतीय संविधानाची ओळख’ या विषयावर संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांचे व्याख्यान होणार असून  दुपारी 12.30 वाजता भारतीय संविधानावर आधारित ‘ही गजल भिमाची’ हा गझल गायक अशोक गायकवाड यांचा गझलांचा कार्यक्रम होईल.  दुपारी 2.30वाजता  स्वप्नील पवार, विशाल ओव्हाळ आणि प्रज्ञा इंगळे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 4.30वाजता ‘सामाजिक क्रांती – एक प्रवास’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.

यामध्ये  अॅड. संभाजीराव मोहिते, प्रा. विनोद इंगळे, प्रा. अशोक भाटकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता विजय सरतापे  यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल. दरम्यान, महापालिका आयोजित आणि बानाई व  रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या  सहकार्याने शहरातील सर्व प्रभागात संविधान संवादक अभियान उपक्रमाद्वारे संविधान रथ तसेच पथनाट्याच्या माध्यमातून  भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करण्यात येणार  आहे. लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सदस्य यात सहभागी असणार आहेत.जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे

Share this: