क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सावधान …! पिंपरीत फिरत आहे बनावट नोटा आणणारी टोळी

पिंपरी(वास्तव संघर्ष ) : पिंपरी चिंचवड शहरात  बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यांनाच राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अपमान आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना पोलिस यंत्रणेचेच याकडे दुर्लक्ष आहे. शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. या बनावट नोटा वापरणारी टोळी पिंपरी चिंचवड  परिसरात फिरत आहे. सुटे पैसे मागण्याचा बनाव करून खोटी नोट देऊन व्यापाऱ्यांना फसवले जाते. 

बनावट नोट सामान्य माणसाला लगेच ओळखू येत नाही. बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना तुमची ही नोट बनावट आहे असे अधिकारी सांगतात. त्या नोटेवर लाल रंगाच्या पेनने फुली मारून संबंधिताचे नाव पत्ता घेऊन बनावट नोट जमा करण्याचे काम बँकेचे अधिकारी करतात. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी तर अशी नोट फाडूनच टाकतात. ग्राहकाने नोट परत मागितली, तरी दिली जात नाही. त्याचा आर्थिक तोटा होत असतानाच अधिकारी अरेरावीच्या भाषेत ‘पंचनामा करून फिर्याद देऊ का’, असा दम देतात. त्यामुळे सामान्य माणूस निमूटपणे हा प्रकार सहन करतो.

सामान्यपणे रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने एखादी तरी नोट बनावट येतेच. बँकेचे अधिकारी नोट जमा करून घेतात हा सर्वसामान्य माणसावरील अन्याय तर आहेच, पण आर्थिक तोट्यावरून बँक अधिकाऱ्यांनी सर्वांसमोर केलेला अपमान जिव्हारी लागणारा असतो. नकली नोट चलनात आणून पिंपरी चिंचचवड मधील  एका व्यापाऱ्याला फसवण्यात आले आहे. व्यापारी माणूस हा चोर नसतो, पण त्याला चोरासारखी वागणूक पोलीस देतात म्हणून व्यापारी हतबल होऊन पोलीस स्टेशनला जात नाही.या व्यापायाला शंभर रूपयांची हुबेहुब दिसणारी नोट देण्यात आली आहे.

पोलिसांनी व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीचा तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बनावट नोटांना आळा घातला नाही, तर गुन्हेगारांचे चांगले फावून निरपराध लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. बनावट नोटांमध्ये पाचशे ,शंभर अशा  नोटांचा समावेश आहे.सणासुदीच्या दिवसामध्ये  पिंपरी चिंचवडमघ्ये बनावट नोटा बाजारात आणणारी टोळी फिरते,असा संशय व्यक्त होत आहे. पोलिस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Share this: