बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

इच्छुकांसमोर तगडे आव्हान..! पिंपरी विधानसभा सुजात आंबेडकर लढणार?

पिंपरी (वास्तव संघर्ष):पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे.सुलक्षणा धर-शिलवंत या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढविल्यास सुलक्षणा धर-शिलवंत याच उमेदवार असतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र असे असले तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास पिंपरी विधासभा  निवडणूक बहुरंगी होऊन प्रचंड गाजणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने  स्वतंत्रपणे सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे केल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्याच पक्षाच्या वाट्याला मतदारसंघ येणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र या विद्यमान आमदारांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार कोण असू शकेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या पिंपरी विधानसभेकरीता थेट सुजात प्रकाश आंबेडकर यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसे झाल्यास पिंपरी विधानसभेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघात सध्या  राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे आमदार आहे. वास्तविक, युती झाल्यास या मतदार संघावर आरपीआयचा दावा राहणार आहे. तरीही भाजपमधून अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीनेही हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

सुजात आंबेडकर यांना महाराष्ट्रातील अनेक जिल्यातील राजकीय निवडणूकीचा अनुभव आहे. पिंपरी विधानसभा हा अनुसूचित जातीसाठी (एससी) साठी राखीव असल्याने आंबेडकर घराण्यातील पहिला आमदार पिंपरी विधानसभेतून झाल्यास कुणालाही नवल वाटणार नाही.

सुजात आंबेडकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेचा डिप्लोमा घेतला आहे. गेली दोन वर्षं त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरी विधासभा ‘सेफ’ मतदार संघ म्हणून सुजात यांना प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने किंवा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत कुठेही अधिकृत भूमिका व्यक्त केलेली नाही. त्यामुळे आगामी काळात ॲड. आंबेडकर कोणती भूमिका घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share this: